समाजाच्या चौकटीत न मावणारी, कधी ओसंडून वाहणारी तर कधी अंधारलेल्या बनात लुप्त होणारी एक वृत्ती. निळ्या आकाशाखाली ते निळ्याशार पाण्यात आपले प्रतिबिंब न्याहाळणारी ती नीला.

तुझ्यात देखील तीच दडलीय. आदिम अनंत अशी स्वतंत्र वृत्ती. कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरीही क्षीण न होणारी. निसर्गाने बहाल केलेल्या सर्व भावभावनांनी ओतप्रोत भरलेली. ज्यासाठी या मानवी देहात अवतरली त्या स्वातंत्र्याची चव पुरेपूर चाखणारी ती एक स्त्री.

कल्पना , नवनिर्मिती आणि त्याची अभिव्यक्ती यांच्यावरचे बंधन झुगारून देणारी ती आकाश आणि नदीच्या क्षितिजावरच्या संगमावर अवतरणारी. जी तुझ्या हृदयात देखील तेवढीच बेफाम असते जेवढी तुला ती दुसऱ्या उत्कटपणे जगणाऱ्या स्त्रीमध्ये दिसते. फरक इतकाच असतो कि ती स्वातंत्र्याला सर्वोच्च किंमत देते तर तु नाते, समाज, नीतीनियम यांच्या हळुवारपणे बांधल्या जाणाऱ्या पाशात करकचून आवळली जातेस.

फक्त एकवार आतल्या त्या आकाशासारख्या मुक्त आणि पाण्यासारख्या प्रवाही नीलेस आवाज देऊन पहा. याची देही, या क्षणी आणि येथेच तु स्वतंत्र, आनंदी आहेस. या जगतास निर्माण करणारी, स्वर्ग आणि संसार या दोन्हींची आधार अशी तू नीला.
Comments