दिवस आणि रात्रीच्या सीमेवरती घुटमळणारी ती वेळ. दिवसभराची लगबग संपलेली आणि जरा कुठे उसंत मिळाली असताना सायंकाळ हळुवारपणे येते. कुणाचा तरी जीव उगाचच कासावीस होतो.

तर घरी परतायला मिळते म्हणून दुसऱ्याच्या आनंदाला उधाण मात्र येते. गायी गुरांच्या रांगा गोठ्याकडे येताना त्यांच्या पायाने उडणारी धूळ आसमंतात सर्वत्र पांगते आणि तिला छेदून पसरणारी सूर्याची किरणे त्या दृश्याला एक मनोरम किनार देतात. समुद्रावरून येणारी हवा दुपारचा उष्मा दूर करते.

आणि ती खडकावर सूर्य अस्ताला जाताना पाहायला येते. तिचा उडणारा पदर आणि भुरभुरणारे केस पाहून माझा श्वास मध्येच थांबतो. का एका माणसाला दुसऱ्या माणसाची एवढी ओढ लागावी ?

गार वाऱ्याची लहर अंगावर एक शहारा आणते आणि मी विचारांच्या जाळ्यांतून स्वतःला सोडवीत तिच्या त्या हालचालींमध्ये पुन्हा एकदा मुग्ध होतो.

कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर नसते व संध्याकालात भाषा मूक होऊन सारी सृष्टी सूर्याचा निरोप घेण्याअगोदर पुन्हा एकदा नर्तन करते.

Words & Images : Yogesh Kardile
Muse : K Raginee Yogesh
All rights reserved.
コメント