जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते. वेचीत वाळूत शंख शिंपले रम्य बाल्य जे तिथे खेळले .
ऐकायला अतिशय सुंदर अशा या ओळी कोकणचा किनारा डोळ्यासमोर उभा करतात. कल्पना करा जेव्हा एखादी मुलगी कोकणाऐवजी ४०० वर्षांपूर्वी कदाचित अरब देशातील एखाद्या वाळवंटी तांड्यावर जर गाणे आर्ततेने गात असेल तर ?
हा विचारच अंगावर काटा आणतो. त्या रेताड जमिनीत तिच्या सारख्या लाखो मुलींच्या आरोळ्या केव्हाच विरून गेल्या असतील. मध्ययुगात गुलामांच्या बाजारात विकण्यासाठी ज्या मुली आणि स्त्रियांना कोकणातुन पळविले त्या कोणाच्या तरी सर्वस्व असतील.
आज कोकणचे किनारे पर्यटन स्थळ आहेत परंतु ते सुरक्षित करण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. छत्रपती शिवराय , छत्रपती संभाजी राजे , सरखेल कान्होजी आंग्रे , सरखेल तुळाजी आंग्रे आणि अनेक कोकणातील नौसैनिक यांचे स्मरण फक्त किल्ले आणि युद्ध याकरिता नसून स्वकीयांच्यासाठी छातीचा आणि दुर्गांचा कोट केल्यामुळे व्हायला हवे.
आजही मुरुड जंजिरा पहिला कि हृदयाला तो टोचतो. काही वास्तूंच्या आठवणी ह्या दुःख दायक असतात आणि त्यांची जाणीव पुढच्या पिढीला करून घ्यावयाला हवी म्हणजे इतिहासाचे ते दुर्दैवी पान परत आपल्या पुढ्यात येऊन उभे ठाकणार नाही. मानवी संस्कृती आणि सौंदर्य हे संरक्षणातच फुलते. त्यामुळे जेव्हा केव्हा कोकणचे किनारे पाहाल तेव्हा तेथील किल्ले देखील पहा. सौंदर्यस्थळांसोबतच शक्तीस्थळे देखील तेवढीच महत्वाची किंबहुना वंदनीय आहे.
Comments