top of page

नृत्य कालीचे

  • Writer: Raginee K
    Raginee K
  • Jun 23, 2024
  • 1 min read

अथांग अंधाराच्या पार्शवभूमीवर टिमटिमणाऱ्या ताऱ्याच्या प्रकाशाला सर्वांगाने व्यापून उरणारी ती. अव्यक्ताला व्यक्त करणारी ऊर्जा. काल या आयमाला वाकवून मर्त्य जगाच्या पलीकडे अनंताचे नर्तन करणारी महाकाली.


 निराकार असणारी मातृशक्ती ; स्त्रीदेहात वेगवेगळ्या रूपाने प्रकट झालेली ती. धर्म, समाजमान्यता आणि संप्रदाय या सर्वांच्या गुंत्यापासून खूप पलीकडची चिरंतन सत्य असलेली ती. मुक्तपणे वाहणारी ऊर्जा माझ्यातली आणि तुझ्यातली. स्वतःच्या निर्माण आणि नाश करणाऱ्या शक्तीची संपूर्ण जाणीव असणारी आणि वेळप्रसंगी वापर करणारी काली.




अव्यक्ताच्या शून्य गर्भातून एक ऊर्जेचा उमाळा वर येतो. अचानकच विस्फोटाच्या रूपातून निर्मितीचे नर्तन सुरु करतो. गरगरविणाऱ्या भिंगरीप्रमाणे सर्वांनाच आपल्या तालामध्ये नाचवितो. सूक्ष्म पेशी ते आकाशगंगा सर्वच तिच्या लयीत अथक नर्तन करतात.

दोन आवर्तनांमधल्या शांततेमध्ये संगीताची निर्मिती होते. तर तिच्या एक एक पदन्यासात गणिताची वैश्विक भाषा आणि सर्व कला स्फुरतात. अव्यक्त आणि अनाहतामधून चैतन्य रसरशीतपणे निर्मिती करते. अंधाराच्या पटलावर ती प्रकाशाचे सर्जन करते. आपल्या रक्तालाही तिचीच ओढ असते.



लाटांच्या थपडा खाणाऱ्या आणि निश्चल प्रस्तरावर बेभानपणे कोसळणाऱ्या पाण्यातही तिचाच ताल असतो. बाहेर तिला शोधणाऱ्यांना ती त्यांच्याच आत बसलीय हे कधी कळत नाही. आणि अंतरीची ओढ देखील मृत्यु देखील थांबवू शकत नाही. अनित्य अशा या संसारात नृत्य मात्र सदैव नूतन राहते. आपल्या सर्वांच्या आत तीच निवास करते.


Photography & Write up : Yogesh Kardile

Muse : K Raginee Yogesh

All rights reserved.


Commentaires


bottom of page